रेशन दिलं मात्र ते शिजवायचं कसं?रिकामा सिलेंडर वाजवायचा का?मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींवर निशाणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्याला आला असताना आता आरोप प्रत्यारोपांच्या तोफा शिगेला पोहचल्या आहेत. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी घरं भरल्याचा आरोप केला . त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत देशात वाढलेल्या महागाईसह इतर अनेक मुद्द्यांवरून त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर बॅटिंग केली आहे. तसेच वरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही धारेवर धरलं . पंतप्रधान मोदींनी लोकांना रेशन दिलं मात्र ते शिजवायचं कसं? सिलेंडरच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की लोकांना सिलेंडर घेणंचं परवडेना झालंय. आधी कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा का? असा खोचक सवाल मुख्यमंत्र्यांनी महागाईवरून केंद्र सरकारला केला आहे.
काँग्रेस उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारानिमीत्त कोल्हापूर मध्ये आले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर हल्ला चढवत,केंद्राने जीएसटीचे पैसे दिले नाहीत, एक तर आमचा हक्काचा जीएसटी दिला नाही आणि पेट्रोल कर का कमी करत नाही म्हणून विचारता? त्यावेळी काही वाटतं नाही का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे. खोट नाट सांगून कदाचित इतर राज्यात तुमचं राजकारण चालत असेल पण महाराष्ट्रात त्याला फळं लागणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाला लगावला .