सोने – चांदीच्या दरात घसरण,भारतीय बाजारात सोने-चांदी झाली स्वस्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र या दोन्ही देशांमधील तणाव कमी होत असल्याने सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर घसरल्याने मंगळवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाली. आज मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 325 रुपयांनी घसरला आहे.गेल्या पाच दिवसात सोन्याचा भाव 3,500 रुपयांनी घसरला आहे.
MCX वर सकाळी 9.10 वाजता, प्रति 10 ग्रॅम सोन्याचा फ्युचर्स दर 325 रुपयांनी कमी होऊन 51,999 रुपयांवर आला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. एमसीएक्सवर चांदीचा दरही 561 रुपयांनी घसरला आणि सकाळी चांदी 68,283 रुपये प्रति किलोवर विकली गेली. गेल्या आठवड्यात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. अशाप्रकारे अवघ्या पाच दिवसांत भाव 3,500 रुपयांनी खाली आले आहेत.
जागतिक बाजारातही पिवळा धातू नरमला
मंगळवारी सकाळी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या स्पॉट किमतीत घसरण झाली. चांदी सुमारे $0.7 ने घसरून $25.11 प्रति औंस झाली. त्याचप्रमाणे, सोन्याची स्पॉट किंमत देखील प्रति औंस $ 1,951.09 वर पोहोचली. गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर प्रति औंस $2,070 च्या वर गेला होता.