पुढच्या ४८ तासांत राज्यात उकाडा वाढणार, मान्सूनच्या आगमानाची तारीखही ठरली?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशातील हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता येत्या काळात मान्सूनच्या प्रवासावर आणि आगमनावर याचा काही परिणाम होणार का, हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून सर्वसाधारण प्रमाणात असेल. पण, त्याआधी आलेल्या मोका चक्रिवादळाचा त्याच्यावर काही परिणाम होणार का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
मोकाविषयी सांगावं तर, रविवारी म्यानमारच्या उत्तर पश्चिम किनाऱ्यावर धडकलेल्या या वादळामुळं तब्बल २७० किमी प्रती तास इतक्या वेगाने वारे वाहू लागले आणि त्यामुळं किनारपट्टी भागातील अनेक घरांचं नुकसान झालं. तिथे वादळ धुमाकूळ घालत असतानाच इथे महाराष्ट्रात मात्र १७ मे पासून उकाडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही वाढ २ ते ३ अंशांनी नोंदवली जाऊ शकते.
मान्सूनच्या आगमानाची तारीख ठरली?
यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सून १५ मे रोजी दाखल होईल असं सांगण्यत आलं होतं. पण, चक्रिवादळामुळं त्याच्या प्रवासात काही अंशी अडथळा निर्माण झाला असून, अंदमानातच तो १९ ते २० मेपर्यंत दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळाची तीव्रता आता कमी होत असल्यामुळं त्याचे थेट परिणाम मान्सूनच्या वाटचालीवर होताना दिसत आहेत. त्याच्या प्रवासातील अडथळे आता दूर होत असल्यामुळं मान्सून जरी अंदमान एखाद्या दिवसानं उशीरा पोहोचला तरीही महाराष्ट्रात मात्र तो ठरलेल्या वेळेतच पोहोचेल.
पुढील २४ तासांत कसं असेल देशातील हवामान?
महाराष्ट्रात मुंबईसह कोकणात उकाडा वाढत असताना राज्याचा उर्वरित भागही याला अपवाद ठरलेला नाही. त्यातच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात या अती उकाड्यामुळंच एखादी अवकाळीची सरही बरसू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशातील हवामानातही पुढील २४ तासांच काही अंशी बदल नोंदवले जाऊ शकतात. ज्यामध्ये पूर्वोत्तर भारतात हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बरसतील. केरळ, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर, दिल्ली आणि राजस्थानमध्ये धुळीचं वादळ येऊ शकतं. उत्तराखंड आणि हिमाचलच्या पर्वतीय भागामध्ये बर्फवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पर्यटकांना हवामानाचा अंदाज घेऊन पुढील बेत आखण्याचं आवाहन यंत्रणा करताना दिसत आहेत.