भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यात रात्रभर मुसळधार पाऊस : शेतकरी हवालदिल

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात होळीचा उत्साह सर्वदूर असताना अवकाळी पाऊस झाला आहे. पालघर, नाशिक, बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटाने पाऊस झाला. यामुळे शेती भागाचं नुकसान झालं असून अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

विक्रमगड,पालघरच्या वाडा, जव्हारसह अनेकभागात रात्री मुसळधार पाऊस झाला. हा भाग बहुतांश शेतीभाग असल्याने येथील शेतकरी, बागायतदार, वीट भट्टी व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तर, आंब्यासह अनेक रब्बी पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातही रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. अतिमुसळधार पावसामुळे चिंतातूर असलेला शेतकरी आता अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाच्या सरी बरसल्या.

यंदा हिवाळ्याने लवकर एक्झिट घेतल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात उकाडा वाढला होता. परंतु, होळीच्या काळात पाऊस पडण्याची शक्यता हवामाने विभागाने वर्तवली होती. त्यानुसार, मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ५ ते ८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

राज्यातील शेतकरी हमीभाव मिळत नसल्याने चिंतेत आहेत. कष्टाने पिकवलेले उत्पादन कवडीमोल भावाने विकावे लागत आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांसमोरील चिंता आणखी वाढली आहे. यामुळे रब्बी पिकांना सर्वाधिक धोका आहे. कांदा, गहू आणि हरभरा पिकाला या अवकाळी पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचीही भीती आहे.

राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीचा उत्साह असतानाच अवकाळी पावसाने नागरिकांच्या आनंदावर विरजण टाकल्याचे चित्र आहे. राज्यात काल संध्याकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी रविवारी संध्याकाळीच पावसाला सुरुवात झाली. विदर्भात नंदूरबार, बुलढाणा आदी ठिकाणी कालच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर आज नाशिक, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच हलक्या सरी कोसळू लागल्यात. या अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!