पुढील चार-पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा ; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने राज्यात जोर धरला आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. तर, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. मात्र, राज्यात आता पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील ३-४ दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.
पुढील चार ते पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. अरबी समुद्राकडून येणारे तीव्र पश्चिमी वारे बाष्प घेऊन येत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाट माथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे.आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया याभागातही येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस बरसणार आहे.
मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार माजला.पावसाने केलेल्या तांडवामुळे नदी नाल्यांना अचानक आलेल्या पुरामुळे रावेर शहरातील दोन जण बेपत्ता झाले असुन मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कोकणात पावसाला चांगली सुरुवात
कोकणात पाऊस चांगलाच बसतोय. त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे.रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्णपणे भरले असून सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.