येत्या ४८ तासांत राज्यात “या” जिल्ह्यात विजांसह मुसळधार पाऊस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मिचॉन्ग वादळामुळे राज्यात देखील पावसाची परिस्थिती तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे, हवामान खात्याने राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आज आणि उद्या पावसाचा इशारा दिला आङे. विदर्भ, मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा तडाखा दिला आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या चक्रीवादळाचा परीणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून येत्या ४८ तासांत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गुरुवार आणि शुक्रवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गुरुवारी पूर्व विदर्भात, तर शुक्रवारी मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.