होळी रे होळी.. पुरणाची पोळी….का म्हटलं जातं पुरणाची पोळी? काय आहे महत्व? जाणून घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l हिंदू धर्मात विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे होलिका दहन किंवा होळी पूजन होय. सात रंगांची उधळण करण्याचा, एकमेकांना प्रेमाच्या रंगामध्ये रंगवण्याचा सण होळी… होळी हा असत्यावर सत्याचा विजय याचं प्रतिक म्हणून साजरी केली जाते. होलिका दहनाला यात सर्वात जास्त महत्व आहे. होलिकेचं दहन आदल्या दिवशी रात्री करायचं आणि दुसऱ्यादिवशी मनसोक्त रंगांची उधळण केली जाते. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री म्हणजे 24 मार्चला होलिका दहन करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा होळी कधी साजरी करावी याबाबत संभ्रम आहे. याचं कारण म्हणजे भद्रा काळ. कोणी म्हणते रात्री 11 नंतर होलिका दहन करावे तर कोणी म्हणते रात्री 9.30 अगोदर सण साजरा करावा अशी चर्चा आहे. मात्र रविवारी (24 मार्च) सूर्यास्तानंतर कोणत्याही वेळी आनंदाने साजरा करावा असे पंचागकर्ते यांनी सांगितले..
फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे 24 मार्चला होलिका दहन करण्यात येणार आहे.हिंदू पंचागानुसार होळीच्या दिवशी दोन शुभ योग बनणार आहे. वृद्धी योग हा रात्री 9.30 पर्यंत आहे. तर ध्रुव योग हा 24 मार्चा पूर्ण दिवस असणार आहे, तर होळी दहनाचा मुहूर्त रात्री 11 वाजून 13 मिनिटे तर रात्री 12 वाजून 07 मिनटापर्यंत असणार आहे. यंदा होळी पूजनावर भद्राचे सावट आहे. भद्रा काळात होलीका दहन करणे शुभ मानले जात नाही. होळीच्या दिवशी भद्रा काळ सकाळी 9 वाजून 54 ते रात्री 11.13 मिनिटापर्यत असणार आहे. भद्रा कालावधीमुळे होळीच्या वेळेबाबत संभ्रम आहे.
होळी रे होळी पुरणाची पोळी… हे आपण लहानपणापासून म्हणत आलो आहे. होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पुरणपोळी बनवली जाते. होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे, कधी विचार केला का होळीला पुरणपोळीच का बनवली जाते?…काय आहे त्यामागील शास्त्र ते जाणून घेऊया..
राज्यभरात होळी किंवा शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक वाईट प्रवृत्तींचा होळीच्या अग्नीत त्याग केला जातो.वाईट प्रवृत्तीवर मिळावलेल्या विजयाचा आनंद म्हणून घराघरात पुरणपोळीचा बेत आखला जातो.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात साजरे केलेले सर्व सण किंवा सणांना बनवण्यात येणारे सर्व खाद्यपदार्थ कृषी कालगणना (इंग्रजीमध्ये शेतीविषयक कॅलेंडर) यांच्याशी संबधीत असते. शेतात प्रत्येक हंगाम किवा ऋतुनुसार येणाऱ्या पिकांवर नैवेद्य दाखवला जातो.
पुरणपोळी बनवण्यामागे काय आहे कारण?
होळी हा सण साधारणपणे मार्च महिन्यात येतो. मार्च महिन्यात रब्बी पिकांची कापणी होते. रब्बी पिके म्हणजे जी पिके थंडीच्या काळात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान घेतली जातात . तर कापणी ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होते. पुरणपोळीसाठी वापरण्यात येणारे गहू, चणा डाळ आणि गुळ ही रब्बीची पिके आहेत. नवीन कापणी केलेल्या पिकांचा वापर करुन विधिवत प्रसाद बनवत तो देवाला अर्पण केला जातो. घरात कोणती नवी गोष्ट विकत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम देवासमोर ठेवली जाते. त्याप्रमाणेच शेतकरी देखील आपल्या शेतात पिकलेले पदार्थ देवाला अर्पण केले जातात. म्हणून आलेली पिकांचा प्रसाद देवाला दाखवला जातो. हंगामातील गोडधोड पदर्थ बनले. भारत हा कृतज्ञताप्रधान देश आहे. नवीन पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून होळीला पुरणपोळी केली जाते.
कधी आहे होळी?
वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून .आला आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला 25 मार्च 2024 रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. एक , दोन नव्हे तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.