सोन्याच्या भावाने घेतली उंच भरारी, चांदीचे भावही वाढले,सणासुदीच्या काळात ग्राहकांची उडाली झोप
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, नवरात्री व दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोने-चांदीची खरेदी करतात, ग्राहकांना खरेदीचे वेध लागले आहे. अनेक जण सोने-चांदीत गुंतवणूक करतात.परंतु यंदा अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या चार महिन्यानंतर सोने-चांदीच्या भावाने लांबचा पल्ला गाठला आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात मौल्यवान धातूने रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. मध्यंतरी सोने-चांदीला उंच भरारी घेता आली नाही. पण दोन दिवसांत सोने-चांदीच्या भावाने मोठी झेप घेतली आहे.
सोन्याच्या भावात तीन दिवसांत 1600 रुपयांची वाढ
गुडरिटर्न्सनुसार, आठवड्याची सुरुवात पडझडीने झाली. सुरुवातीच्या दोन दिवसांत किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली होती. 18 ऑक्टोबर रोजी सोने 540 रुपयांनी वधारले. 19 ऑक्टोबर रोजी सोन्याने 270 रुपयांची उसळी घेतली. 19 ऑक्टोबर रोजी सोन्यात 270 रुपयांची दरवाढ झाली. तर 20 ऑक्टोबर रोजी सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 780 रुपयांची आघाडी घेतली. या तीन दिवसांत सोन्यात 1590 रुपयांची तेजी आली. 22 कॅरेट सोने 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचाही भाव वाढला
आठवड्याच्या सुरुवातीला चांदीच्या भावात घसरण झाली. 17 ऑक्टोबरला चांदी 500 रुपयांनी उतरली. त्यापूर्वी भाव जैसे थे होते. बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली. 19 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 20 ऑक्टोबर रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
IBJA नुसार, 24 कॅरेट सोने 60,693 रुपये होते. 23 कॅरेट 60,450 रुपये, 22 कॅरेट सोने 55,595 रुपये, 18 कॅरेट 45,520 रुपये, 14 कॅरेट सोने 35,505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,991 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.