राज्यात गेल्या अडीच महिन्यात १८१ सापडे, २५६ लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या अडीच महिन्यात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १८१ सापळे टाकून २५६ लाचखोरांना रंगेहात पकडले, त्यात महसूल, पोलिस, पंचायत समिती अन् महावितरण आघाडीवर आहेत.
पैसे दिल्याशिवाय सरकारी अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्यांचे काम करीत नाहीत, अशी ओरड राज्यात नेहमी सुरू असते. त्यात सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी संप पुकारल्यावर अनेकांनी त्याला विरोध दर्शविला.
जुन्या पेन्शनसाठी आठवडाभर संपावर असणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लाचखोरीवर अनेकांनी तोंडसुख घेतले होते. आता त्यांच्या लाचखोरीची थेट आकडेवारीच समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अडीच महिन्यांत राज्यात १८१ सापळा कारवाया केल्या. २५६ लाचखोरांना तब्बल ९२ लाख ७४ हजार ५२५ रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यात महसूल, पोलिस, पंचायत समिती आणि महावितरण खात्याचा अनुक्रमे पहिला, दुसरा तिसरा व चौथा क्रमांक आहे.
शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, अशा सर्वसामान्य घटकांचे एकही काम टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय केले जात नाही. प्रत्येक कामासाठी ठरवून चार्ज लावला जातो. हे पैसे अधिकारी, कर्मचारांच्या खिशात जातात. त्यामुळे यांना पेन्शनची गरज काय?, असा प्रश्न वेगवेगळ्या घटकांमधून विचारला जात होता.
क्लास वन सर्वांत पुढे,
लाच घेणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्यांचा आकडा कमी असला, तरी त्यांची रक्कम ही सर्वात जास्त आहे. राज्यात १६ क्लास वन (वर्ग १) अधिकाऱ्यांनी तब्बल ३५ लाख ५३ हजार ७५० रुपयांची सर्वाधिक लाच घेतली आहे. त्या खालोखाल २९ क्लास टू (वर्ग २) अधिकाऱ्यांनी २७ लाख ५७ हजार १७५ रुपये, १२७ क्लास श्री (वर्ग ३) कर्मचार्यांनी १३ लाख ७२ हजार ३६० रुपये लाच घेतली आहे.
१२ चतुर्थ कर्मचाऱ्यांनी २७ हजार लाच घेतली. तसेच, लाच घेण्यासाठी इतर लोकसेवकांचाही वापर केला जातो. २४ इतर लोकसेवकांनी ५ लाख १८ हजार २०० रुपये लाच घेतली. काही अधिकारी, कर्मचारी खासगी व्यक्तींना पुढे करून लाचेची रक्कम घेतात. त्यांनाही एसीबीने पकडले आहे. राज्यात ४८ खासगी व्यक्तींनी १० लाख ४५ हजार २४० रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा