राज्यात आज कुठे विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या काही भागांमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतमालाचं मात्र नुकसान होत आहे. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अहमदनगर, बीड, छ. संभाजीनगर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, भंडाऱ्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली, या पावसाचा मोठा फटका हा आंबे, काजू आणि इतर फळ झाडांच्या बागांना बसला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे उकाड्यातही वाढ होताना दिसत आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढचे ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात मंगळवारपासून काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील तापमान वाढणार आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेनं कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत दमट वातावरण आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार शहरात आणखी उष्णता वाढणार असून, कमाल तापमान ३४ अंश डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर पुण्यातही तापमानात मोठी वाढ झाली आहे.