चिंता वाढली ; कोरोनाची पुन्हा लाट? भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला
मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। पुन्हा एकदा कोरोनाचं जगावर संकट ओढावलं आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातलं असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जपानमध्ये कोरोनामुळे मृतांच्या वाढत्या आकड्याने चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला आहे. पुढच्या 40 दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 40 दिवस खूप महत्वाचे आहेत. जानेवारीत कोरोनाची प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. कोरोनाची चौथी लाट आली तरी मृतांची संख्या वाढणार नाही, किंवा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय.
पुढचे 40 दिवस महत्वाचे
पूर्व आशियामध्ये कोरोनाची लाट आल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी भारतात कोरोनाची नवीन लाट येते, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे. आता कोरोनाच्या नव्या लाटेने पूर्व आशियाई देशांमध्ये जोर पकडला आहे. चीनपासून, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान या देशांत नवीन कोरोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. या आधारावर, जानेवारीच्या अखेरीस भारतात नवीन रुग्णणांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. झिरो-कोविड पॉलिसी हटवल्यानंतर धोका वाढला
चीनमध्ये झिरो-कोविड पॉलिसी हटवल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाल्याचं पाहिला मिळालं. चीनकडून रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी सुरु आहे. पण तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार चीनमध्ये दररोज लाखो प्रकरण समोर येत असून मृतांचा आकडाही काही हजारांवर आहे. चीनशिवाय अमेरिका आणि जपानमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. जपानमध्ये बुधवारी कोरोनामुळे 415 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जपानमध्ये एका दिवसात मृत्यूचा हा मोठा आकडा आहे. या देशांमध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 ने थैमान घातलं आहे. या सब व्हेरिएंटचा संक्रमित वेग प्रचंड असून एका व्यक्तीपासून 16 लोकांना लागण होण्याची भीती आहे.
भारतात BF.7 सब व्हेरिएंटचा धोका
भारतात गेल्या आठवड्यात BF.7 व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळून आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात विदेशातून आलेल्या 6 हजार प्रवाशांमध्ये 39 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. केंद्र सरकारने चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूर या देशातून आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. दुर्लक्ष करणं पडू शकतं महाग
एका सर्व्हेनुसार 10 पैकी 7 भारतीयांनी चीनमधून आलेल्या विमानांना बंदी घालण्याची मागणी केली आहे. पण अजूनही सरकारकडून प्रवास बंदी लावण्यात आलेली नाही. पण याआधीही भारताने परदेशातून आलेल्या विमानांना बंदी घातली होती. यानंतरही भारतात कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. कोरोनाच्या गेल्या तीन लाटांमध्येही रुग्णसंख्येत हळूहळू वाढ आणि नंतर वेगाने फैलाव झाला होता.
जानेवारी 2020 मध्ये जगभरात कोरोना वाढला होता. पण यानंतरही सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी आणण्यात उशीर केला. भारतात रुग्णसंख्या वाढल्यानंतर 23 मार्च 2020 ला आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही हाच अनुभव आला. लोकांकडूनही बेजबाबदारपणा वाढला, मास्क न वापरण्याबरोबरच सोशल डिस्टंसिंगचा पालन करणंही बंद केलं, याचे परिणाम भोगावे लागले. कोरोनाची दुसरी लाट सर्वात धोकादायक होती. यात अनेक लोगांचा मृत्यू झाला होता. तिसऱ्या लाटेलाही हाच बेजबाबदारपणा कारणीभूत ठरला.
भारतात कोरोनाची पहिली लाट
भारतात 30 जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा पहिलं प्रकरण केरळमध्ये आढळलं. त्यानंतर 17 डिसेंबर 2020 रोजी कोरोनाच्या लाटेने उच्चांक गाठला. या एका दिवसात तब्बल 98 हजार रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर 10 फेब्रुवारी 2021 पासून कोरोनाची लाट ओसरत गेली. पहिली लाट तब्बल 377 दिवस होती. यादरम्यान 1.08 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली तर 1.55 लाख मृत्यूची नोंद झाली. म्हणजे प्रत्येक दिवशी साधारण 412 मृत्यू झाले. भारतात कोरोनाची दुसरी लाट
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च 2021 पासून रुग्णांची संख्या अचानक वाढून लागली. एप्रिल आणि मे महिन्यात दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठला. 1 एप्रिल ते 31 मे या 61 दिवसात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. या काळात 1.60 करोड नवी रुग्ण सापडले. तर 1.69 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज साधारण 2,769 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. 6 मे 2021 रोजी एका दिवसात तब्बल 4.14 लाख रुग्ण आढळले होते. भारतात कोरोनाची तिसरी लाट
ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट आली. 27 डिसेंबर 2021 कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. 21 जानेवारीला तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला. या दिवशी तब्बल 3.47 लाख प्रकरणं समोर आली. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख घटत गेला. तिसरी लाट पहिल्या दोन लाटांपेक्षा कमी धोकादायक होती. तिसऱ्या लाटेत भारतात 50.5 लाख रुग्णसंख्येची नोंद झाली तर 10 हजार 465 लोकांचा मृत्यू झाला.