महाराष्ट्र

जळगाव,धुळे,नाशिक सह राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, परतीच्या पावसाची तारीख अनिश्चित

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतही पाऊस ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत परतीचा प्रवास करत असतो. परंतू, यंदा मुंबईत परतीच्या पावसाला उशीरा सुरूवात होणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अनुमानानुसार मुंबई आणि कोकणात १० ऑक्टोबरपर्यंत काही ठिकाणी पाऊस असणार आहे. परंतू अद्याप परतीच्या पावसाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, बीड येथे सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर, सातारा येथे शनिवारपर्यंत तर सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना येथे रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता असून, मुंबई तसेच महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस दिवाळीपर्यंत नसेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे

प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण कोकणात शनिवार पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर त्याची व्याप्ती वाढेल. सोमवार १० ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र येथे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपासून उत्तर प्रदेशचा काही भाग, तेलंगणा, विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश येथे पावसाची शक्यता असून परिणाम म्हणून राज्यात पावसाळी वातावरण आहे. सध्या वाऱ्यांची दिशाही बदलती आहे. सध्या राज्यात जोरदार पाऊस पडत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!