जळगाव मध्ये राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार नाशिक, जळगाव, नंदुरबार, मुंबई, ठाणे, पालघर, धुळे या भागात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता राज्यातील वातावरण बदललं आहे. अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे
गुरुवारी जळगावमध्ये राज्यातल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली., जिथं पारा 44.8 अंशांवर पोहोचला होता. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पारा 42 ते 45 अंशांपर्यंत पोहोचला होता. मुंबई आणि पुण्यातही हीच परिस्थिती होती. तुलनेनं समुद्र जवळ असल्यामुळं मुंबईत आर्द्रता जास्त असल्यानं
उष्णतेचा दाह अधिक जाणवला.
पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवमान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्याच्या घडीला देण्यात आलेला उष्णतेच्या लाटेचा इशारा पाहता, नागरिकांनी सकाळच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये असं आवाहन यंत्रणांनी केलं आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी सूती कपड्यांचा वापर, पुरेसं पाणी पिणं, पाण्याचा अंश अधिक असणाऱ्या फळांचं सेवन करणं अशा उपाययोजना करण्याचं आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.