दोन बायका फजिती ऐका! दोघींसाठी चक्क पतीचीच वाटणी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। कौटुंबिक वादानंतर जमीन, घर आणि संपत्तीची वाटणी होताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र तुम्ही कधी पतीचीच वाटणी झाल्याचं ऐकलं आहे? बिहारच्या पूर्णिया इथून एक असंच अजब प्रकरण समोर आलं आहे. यात दोन बायकांच्या सहमतीने एका पतीची चक्क वाटणी करण्यात आली. एका पतीची दोन पत्नींमध्ये वाटणी केल्याचं अजब प्रकरण ऐकून सगळेच थक्क झाले.
पूर्णिया पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पतीची अशी अनोखी विभागणी समोर आली आहे. हा परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. कौटुंबिक समुपदेशन केंद्राने पतीला महिन्यात पहिल्या पत्नीसोबत 15 दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत 15 दिवस राहण्याचे निर्देश दिले आहेत. कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी पूर्णिया येथे पोलीस कौटुंबिक समुपदेशन केंद्र आहे. शुक्रवारी इथेच पतीला दोन पत्नींमध्ये वाटून देण्याची अनोखी सूचना देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पूर्णिया जिल्ह्यातील भवानीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोदियारी येथे राहणारी महिला तिच्या पतीची तक्रार घेऊन पोलिसांत पोहोचली होती. महिलेचा आरोप आहे की तिचा नवरा आधीच विवाहित आहे. त्याला 6 मुलंही होती, असं असतानाही त्याने महिलेला फसवून पुन्हा लग्न केलं, पण आता नवरा तिच्यासोबत राहात नाही. दुसरीकडे पहिली पत्नीही पतीसोबतच राहण्याच्या हट्टावर ठाम होती.
दोन्ही बायकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कुटुंब समुपदेशन केंद्रातील लोकही गोंधळात पडले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कौटुंबिक समुपदेशन केंद्राने निर्णय घेतला की, पतीला दोन्ही पत्नींना आपल्यासोबत ठेवावं लागेल. नवऱ्याला दोघींची काळजी घ्यावी लागेल. कुटुंब समुपदेशन केंद्राने दोन्ही पत्नींना वेगवेगळ्या घरात ठेवण्याची सूचना त्याला दिली. या सोबतच महिन्याचे पहिले 15 दिवस पतीला पहिल्या पत्नीसोबत राहावं लागेल, तर महिन्याच्या शेवटचे 15 दिवस पतीला दुसऱ्या पत्नीसोबत राहावं लागेल, अशी तरतूद करण्यात आली. कुटुंब समुपदेशन केंद्राच्या या निर्णयाला पती आणि दोन्ही पत्नींनी सहमती दर्शवली. यानंतर पती आणि दोन्ही पत्नींकडून एक बॉण्ड भरला गेला. जेणेकरून नंतर कोणीही याबाबत तक्रार करणार नाही.