उत्तर महाराष्ट्रासह “या” जिल्ह्यात अवकाळी पाऊस,राज्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह गारपीटीचाही इशारा
मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामानविभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
राज्यात जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, जालना, ठाणे रायगड आणि नंदूरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज ही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन दिवस अनेक भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, काही भागांत अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून, राज्यातील अनेक शहराच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. येत्या दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून, त्यानंतर उकाडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईचं कमाल तापमान 35. 2 अंश सेल्सियस तर किमान तापमान 23. 5 अंश सेल्सियस आहे. छत्रपती संभाजीनगरात कमाल तापमान 34.8 तर किमान तापमान 18.8 अंश सेल्सिअस इतकं आहे. नागपूरचं कमाल तापमान 34. 6 तर किमान तापमान 18.0 अंश सेल्सिअस इतकं आहे.