स्थानिक स्वराज्य निवडणुका पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी पर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। स्थानिक स्वराज्य संस्थां संदर्भातली सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. मंगळवारी हे प्रकरण लिस्ट होते पण सुनावणी झाली नव्हती. आज हे प्रकरण मेन्शन झाले आणि त्यानंतर सुनावणी झाली.
कोरोना काळापासून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण, सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्यातल्या महापालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे निवडणुकांचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.
‘महाराष्ट्रात ट्रिपल चाचणीचे संकलन केले जाते. संदर्भात अडचण आहे, असं महाधिवक्ता यांनी कोर्टात सांगितलं. तर ‘व्यापक आदेशावर सूचना घ्या. या काळात निवडणुका घेणे योग्य होणार नाही. पुढील तारखेपर्यंत, अंतरिम आदेश राहणार आहे, असे निर्देश सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिले. त्यामुळे 3 आठवडे सुनावणी लांबणीवर गेली आहे.
92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. पण पुढील सुनावणी पर्यंत जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र मंगळवारी घटनापिठाची समोर सुनावणी सुरू असल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आज हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर मेन्शन करण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वरील प्रमाणे निर्देश दिले.