महाविकास आघाडीची ‘पंचसूत्री’; अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या दहा घोषणा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री सादर करताना कृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पाच महत्वाच्या गोष्टींवर केंद्रीत अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांत 4 लाख कोटी रूपये उपलब्ध करुन देणार. कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 23 हजार 888 कोटी तरतुद केली आहे तर आरोग्य क्षेत्रासाठी 5 हजार 244 कोटी रुपये तरतुद केली आहे. मानव व मनुष्यबळ विकासासाठी 46 हजार 667 कोटी तरतुद केली आहे तर पायाभूत सुविधा व वाहतूकीसाठी 28 हजार 605 कोटी तरतुद करण्यात आली आहे. उद्योग व उर्जा विभागासाठी 10 हजार 111 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या दहा घोषणा
1) भूविकास बँकेच्या 34,788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी, बँकेच्या कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाख रूपये एवढी देणी अदा करणार
2) हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
3) फिजीओथेरपी वैद्यकीय घेणार, नांदेड, अमरावती, जालना, भंडारा, अहमदनगर आणि सातारा येथे प्रत्येकी 50 खाटांची प्रथम दर्जाची ट्रॉमा केअर युनिट उभारणार.
4) 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना ई शक्ती योजनेतून मोबाईल सेवा देणार
5) शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिंनीसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सींग मशिन 6) छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूर, ता.हवेली जि.पुणे या परिसरात स्मारकासाठी 250 कोटी रुपये निधी उपलब्ध करणार.
7) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांकरिता 10 कोटी रुपये निधी
8) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते भंडारा-गोंदिया,नागपूर ते गडचिरोली असा विस्तार करणार.
9) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 3000 नवीन बसगाड्या व 103 बसस्थानकांच्या आधुनिकीकरण यासाठी भांडवली अर्थसहाय्य.
10) मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 98 गुंतवणूक करारातून 189000 हजार कोटी रूपये गुंतवणूक आणि रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन संधी, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30,000 अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगार संधी