महाराष्ट्रराजकीय

आमदारांना मंत्रीपदाचे वेध, इच्छुकांचे लॉबिंग सुरू, हालचालींना वेग,यांची नावे चर्चेत

मुंबई,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांवर सोपवल्याने शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. हे सरकार आल्यापासून या सरकारचा आत्तापर्यंत फक्त एकदाच शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह १८ आमदारांवर सध्या राज्याची धुरा आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आता लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे इच्छुक आमदारांनी मंत्रिपदी नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिपदासाठी दक्षिण महाराष्ट्रातील आमदार हे सर्वाधिक इच्छुक आहेत. यामध्ये आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील, अनिल बाबर, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर यांच्या नावाचा समावेश आहे.

मंत्रिपद मिळावे यासाठी आमदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. तसेच पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्याचे काम सुरू झाले असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. अनिल बाबर, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे गटात प्रवेश केला, त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव प्रामुख्याने येण्याची शक्यता आहे. पण असे असले तरी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांचे मंत्रिमंडळाच्या विस्तारात जवळपास नाव निश्चित झाले आहे, कारण भाजप पक्ष कठीण परिस्थितीत असतानाही कोरे यांनी भाजपची साथ सोडली नाही, ज्यामुळे याचा त्यांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर आणि अनिल बाबर यांची मंत्रिमंडळ विस्तारासाठी नाव चर्चेत आहे.

तसेच, कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे एकमेव आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुरेश खाडे यांनी सुद्धा मंत्रिमंडळातील आपल्या स्थानावर दावा केला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिंदेंसोबत असलेल्या अनेक आमदारांनी तर मंत्रिपदाच्या लालसेपोटी ठाकरे गटातून बाहेर पडत शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता जर इच्छुक असलेल्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही मिळाले तर यामुळे सरकारची मोठी कोंडी होऊ शकते, असे बोलले जात आहे.

राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा गैरफायदा घेत एका भामट्याने भाजप आमदारांना फसविल्याची धक्कादायक घटना काल १७ मे बुधवारी उघडकीस आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा सहाय्यक असल्याचे सांगत नीरज सिंह राठोड याने मंत्रिपद मिळवून देतो, असे सांगत भाजप आमदारांकडून पैसै उकळण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी फसवणुक होत असल्याचे लक्षात येत याबाबतची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत या भामट्याला गुजरातमधून अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!