MLC Election : माझे मत खडसेंनाच; एमआयएमचे आमदार ट्रायडंटमध्ये दाखल
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एमआयएमने (AIMIM) विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आमचं एक मत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना देणार असल्याचं म्हटलं आहे. दुसऱ्या मताचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारूख शाह हे ट्रायडंटमध्ये दाखल झाले. त्यांनी माझं मत राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनाच असेल असं स्पष्टपणे सांगितलं आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यामुळे एमआयएममध्येच आघाडीत कुणाला मतदान करायचं यावरून दुमत असल्याचं उघड झालं आहे. आज संध्याकाळपर्यंत एमआयएमकडून दोन्ही मतांबाबत अधिक तपशीलाने माहिती जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
ज्या हॉटेलात राष्ट्रवादीच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे त्या ट्रायडंट हॉटेल मध्ये एमआयएमचे आमदार फारुख शाह हे आज थेट पोहचले, यावेळी हॉटेलात उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. अजित पवार यांच्या भेटीसाठीच ते हॉटेलात आले होते. एकनाथ खडसे हे आमचे खानदेशातील लाडके नेते आहेत. त्यांना मतदान करण्यासाठी मी आलो आहे. खडसे यांना पहिल्या पसंतीचं मत देणार असल्याचं सांगण्यासाठी मी अजित पवार यांच्या भेटीला आलो आहे, असं फारुख शाह यांनी सांगितलं. राज्यसभा निवडणुकीत आम्ही आघाडीसोबत होतो. आताही आघाडीसोबतच आहोत. आमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे रात्री उशिरा आपली भूमिका जाहीर करणार आहेत. पण मी खडसे यांनाच मतदान करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जलील यांचा फोन नाही
चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करणार असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितल्याबाबत शाह यांना विचारण्यात आलं. त्यावर हंडोरेंना कुणी मतदान करण्याचं जाहीर केलं हे माहीत नाही. इम्तियाज जलील यांचा आम्हाला फोन आला नाही. आदेशही आला नाही. फक्त आघाडीलाच मतदान करायचं हे ओवैसी यांनी आम्हाला सांगितलं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे एमआयएममध्ये समन्वय नसल्याचं सांगितलं जात आहे.
फारूख शाह-पवार यांची चर्चा
दरम्यान, फारूख शहा आणि अजित पवार यांची चर्चा झाली. यावेळी शाह यांनी राष्ट्रवादीला त्यातही खडसे यांना मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे राष्ट्रवादीचं काही प्रमाणात टेन्शन दूर झाल्याचं दिसत आहे.