मान्सून सुरूच, हा परतीचा पाऊस नाही,जळगाव सह राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज (ता.09) दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाला असला तरी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे. उद्यापासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. तर ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे.
दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर दुपारी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे. अनेक भागात तर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. आज (ता. 09) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा, तसेच उर्वरित महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे कोकणात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा कोल्हापूर भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांसह पावसाचा इशारा पालघर ठाणे, मुंबईमध्ये देण्यात आला आहे.
तसेच नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागातही विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.