महाराष्ट्रात अखेर मान्सून दाखल ; चक्रीवादळाचा जोरही वाढला
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आता पावसाची प्रतिक्षा संपलेली असून अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सूनचं ११ जूनला महाराष्ट्रात आगमन झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावासाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात पूर्णपणे सक्रिय होणार आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळही तीव्र झाले आहे.
दक्षिण कोकणातला काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूननं व्यापला
दक्षिण कोकणातला काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग मान्सूननं व्यापला आहे. तर, संपूर्ण गोवा, कर्नाटकमध्ये मान्सून दाखल झाला. दरम्यान राज्यात पुढच्या ४,५ दिवसात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
येत्या २४ तासांत बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र रूप धारण करणार
बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासांत तीव्र रूप धारण करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर जाणवू शकतो. मात्र मुंबईला त्याचा फारसा धोका नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
समुद्र खवळलेलाच आहे
शनिवारी जोरदार वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात धूळ आणि वाळूचे लोट उसळले होते. त्यामुळे समुद्रही खवळला होता. रविवारी देखील समुद्र खवळलेलाच आहे. जोरजोरात लाटा उसळत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमेस सुमारे ७०० किमीवर आणि मुंबईच्या नैऋत्येला ६३० किमीवर आहे. आगामी २४ तासांत ते आणखी तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टी आणि गुजरातमध्येही जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.