मान्सून अपडेट : दक्षिण अंदमानच्या समुद्रात 3 दिवस आधीच मान्सून दाखल
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या नागरिकांसाठी एक खुशखबर आहे. नैऋत्य मान्सून आता अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने माहिती दिली असून, पुढील 3 ते 4 दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरवर्षी साधारण मान्सून हा अंदामानमध्ये 22 मे रोजी दाखल होत असतो. मात्र यंदा (2023) तीन दिवस आधीच मान्सून अंदमानातील काही भागांत दाखल झाल्याची माहिती मिळते. हवामान विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन 4 दिवस उशीरा होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यावर्षी 4 जून रोजी दाखल होणार आहे.
दरम्यान, स्कायमेट या खाजगी एजन्सीच्या अंदाजानुसार, अंदमानात मान्सून उशिराने दाखल होणार आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत असून, तो विलंबाने दाखल होईल. तसेच, महाराष्ट्रात 9 जून आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
केरळात मान्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज असला तरी, 4 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 9 तारखेपर्यंत आणि मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज आहे.