राज्यात सप्टेंबर मध्ये कोसळणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस,”या” जिल्ह्यात होणार अतिवृष्टी?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ स्थिती कायम आहे. अशा वातावरणात सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणाऱ्या उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल.
अतिवृष्टी कुठे होणार?
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, देशाच्या तीस ते चाळीस टक्के भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पन्नास टक्के भागांत सरासरीनुसार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस : माणिकराव खुळे
सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस असेल. तापमानाची स्थिती काय राहिल यांसदर्भातील माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मराठवाड्यातील औरंगाबाद सोडून सर्व जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि विदर्भातील अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस. वरील जिल्ह्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात म्हणजे संपूर्ण खान्देश, अहमदनगर, सांगली, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे आणि दक्षिण नाशिक व उत्तर औरंगाबाद जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, नांदगाव, येवला, वैजापूर ते सिल्लोड पर्यंत तालुक्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतू प्रॉबबिलिटीच्या भाषेत बोलायचे झाल्यास ही शक्यता थोडी कमी म्हणजे ४० टक्के जाणवत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.
परतीचा प्रवास कधी?
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमधून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचे संकेत हवामान विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. मात्र, सध्या तरी पावसाच्या परतीच्या प्रवासाबाबतची स्थिती तयार झालेली नाही. त्याबाबतची स्थिती दिसून येताच, ती जाहीर केली जाईल, असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी सांगितले.