नगरपालिका- महापालिका निवडणुका जानेवारीत? मुख्यमंत्री कार्यालयाने केले स्पस्ट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी येत्या 1 नोव्हेंबरला होणार आहे. अपात्रतेच्या याचिकेसह इतर मुद्द्यांवर ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतर राज्यातील आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूकांबाबत निर्णय होणार आहे.
नुकताच अंधेरी पोटनिवडणुकीवर राज्यभरात राजकारण पेटलं आहे. ही निवडणूक शिवसेनेचे दोन्ही गट स्वतंत्र पक्षनाव आणि चिन्हाने लढवणार आहेत. त्यानुसार, या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असून, मशाल हे चिन्ह असणार आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षाचे नाव असून, ढाल-तलवार हे त्यांचे चिन्ह असणार आहे. दरम्यान, येत्या 3 नोव्हेंबरला ही निवडणूक होणार आहे. आणि शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांविरोधात लढणार आहे, त्यामुळे शिवसेनेचा कोणता गट या निवडणुकीत बाजी मारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.