राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरण ; शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता केली गेली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही. घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात, असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलांकडून ३१ जानेवारी रोजी आमदार अपात्रता सुनावणीवेळी करण्यात आला. आजच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादीची आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण झाली असून आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. येत्या १५ फेब्रुवारीआधीच राहुल नार्वेकर हे आपला निवडा देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेच्या सुनावणीत शरद पवार गटाच्या जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, अनिल भाईदास पाटील यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा युक्तिवाद ॲड. जगतियानी यांच्याकडून करण्यात आल्यानंतर आज अजित पवार गटाच्या वकिलांकडून शरद पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे
कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. बैठकीचे शरद पवार अध्यक्ष हाेते, मात्र निवडणूक न घेताच नेमणुका झाल्या.पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच झालेल्या नाहीत. निवडणूक घेऊ असे सांगितले, पण पक्षातील पदरचनाच तशी नाही. पक्षात वाद असून कोणता गट खरा आणि कोणाला किती जणांचा पाठिंबा याचाही ताळमेळ नाही. मूळात पक्षाची समितीच केवळ कागदावर असल्याने जी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष, खजिनदार असल्याचे बोलते, ती व्यक्ती सह्या कशी करू शकते? असा सवाल अजित पवार यांच्या वकिलांकडून करताना जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शंका उपस्थित करण्यात आली.
अजित पवार इतर समर्थक आमदार अपात्र ठरू शकत नाहीत. कारण शरद पवार यांनी एकट्याने पत्रकार परिषद घेऊन सरकारमध्ये जायचे नाही हे कसे ठरवले. आमदारांनी शिवसेनेबरोबर किंवा भाजपाबरोबर सरकार बनवू नये हे कुठे म्हटले नाही. शरद पवारांनीच २०१४ साली भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता, ही बाब यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शिवसेना- भाजपा सरकारमध्ये सामील न होण्याबाबत पक्षाच्या धोरणाबाबत पक्षाध्यक्ष किंवा पक्षाच्या कार्यकारिणीकडून कोणतीही लेखी सूचना देण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवार आणि इतर समर्थक आमदार अपात्र ठरू शकत नाहीत, असा दावा वकिलांकडून करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना उद्या, शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपले लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. राष्ट्रवादीची संघटनात्मक रचना काय असते? आणि ती रचना सांगितल्यानंतर त्यात बहुमत कोणाला आहे? हे दोन मुद्दे स्पष्ट करण्याच्या सूचना राहुल नार्वेकर यांनी दिल्या आहेत.