नवे संकट ; काळ्या बुरशीने घेतला महाराष्ट्रात ४२१ जणांचा बळी, आतापर्यंत ३,९१४ रुग्णांची नोंद
Monday To Monday NewsNetwork।
मुंबई(वृत्तसंस्था)। महाराष्ट्रावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फार वाईट परिणाम झाला आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात यायला सुरुवात झाली आहे. रुग्णसंख्येत किमान घट होणे सुरु झाले आहे. मात्र दुसरीकडे म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीचा धोका वाढत आहे. राज्यातील लोक कोरोनामुळे आधीच हैराण झालेले असताना कोरोनानंतर होणाऱ्या या बुरशीजन्य आजारामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात काळ्या बुरशीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत काळ्या बुरशीमुळे तब्बल ४२१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाहून अधिक झापाट्याने काळ्या बुरशीची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. राज्यात आतापर्यंत ३ हजार ९१४ म्युकरमायकोसिस किंवा काळ्या बुरशीच्या रुग्णांची नोंद करण्यात आली. पोस्ट कोविडनंतर झपाट्याने वाढणाऱ्या या नव्या आजारामुळे महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे राहिले आहे.
केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अँम्फोटेरिसिन बी औषधाच्या ३० हजार १०० अतिरिक्त कुप्यांचे वाटप केले आहे. अँम्फोटेरिसिन बी या औषधांचा वापर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारांसाठी करण्यात येत आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच ज्याला काळी बुरशी असेही संबोधले जाते. या आजारामुळे नाक,डोळे,सायनस आणि त्याचप्रमाणे कधी कधी मेंदूवरही वाईट परिणाम करत आहे.अशी माहिती केंद्रीय रसायन व खत मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी सोमवारी दिली.
गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असे म्हटले आहे की, अँम्फोटेरिसिन बी औषधाच्या ३० हजार १०० अतिरिक्त कुप्यांचे वाटप करण्यात आले. नव्या वाटपा अंतर्गत महाराष्ट्राला ५ हजार ९०० कुप्या जास्त देण्यात आल्या आहेत. त्यानंतर गुजरातला अँम्फोटेरिसिन बी औषधाच्या ५ हजार ६३० कुप्या देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशला १,६००,मध्य प्रदेशला १,९२०, तेलंगणा राज्याला १,२०० औषधांच्या कुप्या, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशला १,७१०, राजस्थान ३,६७०,कर्नाटकला १,९३० आणि हरियाणाला १,२०० अतिरिक्त कुप्या देण्यात आल्या आहेत.