पुढचे ३ दिवस ‘मुसळधार’, महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। देशाच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. सुमारे १२ तास झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग ठप्प झाले होते. या पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शिवाय, महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हवमान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २-४ दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वाराही वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच, मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
याशिवाय रविवारी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत ११ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात सध्या पावसाची संततधार कायम आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पुढील ३ ते ४ दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाळा संपल्यानंतरही पाऊस पडत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या भागात आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी चक्रीवादळाचा प्रभाव कायम आहे. ऑक्टोबरमध्ये मान्सूनच्या परतीची वेळ असते, मात्र अजूनही अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. सुमारे १२ तास झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग ठप्प झाले होते.