उत्तर महाराष्ट्र,विदर्भासह राज्यात पावसाचा इशारा, राज्यावर आस्मानी संकटाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहे.फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे गेला आहे. परिणामी उन्हाचा चटका आणि झळा वाढत असून, उकाड्यातही वाढ होत आहे. यामुळे दिवसा उन्हाचा चटका तर रात्री थंडीचा कडाका अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातच राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. पूर्वेकडून येणारे वारे आणि उत्तर-दक्षिण ढगांची द्रोणीय स्थिती यामुळे राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शनिवार ४ मार्च पासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर रविवार आणि सोमवारी विदर्भात पाऊस पडू शकतो, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवारी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक हलक्या सरी, मेघगर्जना याचा अंदाज आहे. अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये रविवारी आणि सोमवारी हलक्या सरींची शक्यता आहे.
तसेच सोमवारी ठाणे जिल्ह्यातही हलक्या सरी पडू शकतात. मुंबईमध्ये मात्र ढगाळ वातावरण असले, तरी अद्याप पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही. रविवार आणि सोमवार या दोन दिवसांमध्ये मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भात मात्र वाढू शकतो.
विदर्भातही विजा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे रविवार आणि सोमवारी मेघगर्जनेसह वीजा आणि हलक्या सरींची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथेही मेघगर्जनेसह विजा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारसाठी विदर्भात पिवळ्या रंगातील इशारा म्हणजे वातावरणाकडे लक्ष ठेवून राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.