भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

आता भाजपाच्या निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेत मोठी फूट पडल्याने। राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले.शिवसेनेचे ३९ आमदार फुटले. आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं भविष्य काय असेल, याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विधानसभेत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्हीप काढण्यात आला आहे. हा व्हीप न पाळणाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यावर पुढे जे होणार त्यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पुढेही शिवसेनेत आणखी फूट पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. या स्थितीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडेही अनेकांचे लक्ष आहे. पवारांसमोरही पक्षाचे भविष्य, पक्षाचे नेतृत्व आणि विरासत कुणाकडे जाईल याबाबतचेही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर आता शरद पवार यांच्यासमोरही पक्ष फुटू नये यासाठी कठोर परीक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यातच आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा होते आहे.

आता राष्ट्रवादीचा नंबर?
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जातील, याची कल्पना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्याची रणनीतीही ठरले असल्याचे सांगितले जाते आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना तोडण्यात यश आल्यानंतत आता भाजपा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लक्ष केंद्रित करेल असे सांगण्यात येते आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही फास?
महाविकास आघाडी सरकारमध्ये कारवाई झाली ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच. आघाडी सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचीही संपत्ती कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जप्त करण्यात आलेली आहे. आयकर विभागाने, गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नीकटवर्तीयांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारीही केलेली आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा शिवसेनेसोबतच, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही घेरत असल्याचे दिसते आहे.

अजित पवारांचे नीकटवर्तीय फडणवीसांच्या भेटीला?
नव्या शिंदे सरकारच्या शपथविधीनंतर, अजित पवार यांचे नीकटवर्तीय धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे हे राज्यातील मोठे ओबीसी नेते आहेत. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. विरोधी पक्षात असतानाही त्यांचे फडणवीसांशी चांगले संबंध आहेत. मुंबईत नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास वेळ लागणार नाही, असे सांगण्यात येते आहे. ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव पाहता, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच टार्गेटवर असल्याचे स्पष्ट आहे, असे काही नेते खासगीत सांगत आहेत.

डाव अजित पवारांवर खेळू शकते भाजपा?
आता भाजपा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर डाव खेळू शकते, अशी भीती अनेकांना वाटत आहेत. २०१९ साली अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा अचानक झालेला शपथविधी आणि जोन दिवसांचे सरकार अजूनही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. या काळात अजित पवारांविरुद्धची अनेक प्रकरणे बंद करण्यात आली होती, हेही अनेकांना माहित आहे. सध्या आयकर विभागाची नजर अजित पवारांवर आहे. त्यामुळेही हे घडण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे राष्ट्रवादीत अद्याप उत्तराधिकारी कोण, हे ठरलेले नाही. याची स्पष्टता नसल्यानेही अजित पवार असे पाऊल उचलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील हा छुपा संघर्ष असल्याचे सांगण्यात येते. हे सगळे पक्षाच्या पुढील वाटचालीवर परिणाम करण्याची शक्यता आहे. यातले काही प्रश्न असे आहेत की ज्याची उत्तरे शरद पवार यांच्याकडेच आहेत, असेही सांगण्यात येते आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!