ओबीसी राजकीय आरक्षण;आज सुप्रिम कोर्टात सादर करणार इम्पिरिकल डेटा, दिलासा मिळणार?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुनावणी पार पडणार आहे. बांठिया आयोगानं तयार केलेला इम्पिरिकल डेटाचा अहवाल यावेळी कोर्टासमोर सादर केला जाईल. न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. या अहवालावरुन राज्याला दिलासा मिळतोय का? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. हा अहवाल काय म्हणतोय पाहुयात.
सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत वारंवार एक गोष्टी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत ट्रिपल टेस्टची पूर्तता होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. आता बांठिया आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सरकारला ओबीसींची आकडेवारी दिली आहे. ही आकडेवारी मिळवताना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं पालन केल्याचा दावाही केला जात आहे. बांठिया आयोगाचा हा ८०० पानांचा अहवाल शुक्रवारी राज्य सरकारकडे सादर झाला त्यानंतर तो कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर आज यावर सुनावणी होणार आहे. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसींची संख्या ३७ ते ४० टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार, लोकसंख्यानिहाय ओबीसींना जास्तीत जास्त २७ टक्के आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी या अहवालातून करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशच्या अहवालाची सुप्रीम कोर्ट जास्त सखोल पडताळणी केली नव्हती त्यामुळं या राज्याला कोर्टानं तात्पुरती तातडीची मंजुरी दिली होती. महाराष्ट्रातही नगरपंचायचीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळं कोर्ट आता महाराष्ट्राच्या अहवालावर काय निकाल देतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावर आता सरकारला तातडीचा दिलासा मिळतोय का? हे बघावं लागणार आहे. यावर सकाळी ११ ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होणार आहे.
राज्यात ओबीसींची संख्या ४० टक्के? वाद होणार का?
राज्यात ओबीसींची संख्या ४० टक्क्यांपर्यंत असल्याचं निष्कर्ष काढण्यात आल आहे. त्याआधारे बांठिया आयोगानं २७ टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्क्यांच्या जवळपास असल्याचं सांगितलं जात असताना ती कमी दाखवण्यात आल्यानं यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.