राज्यभर महाआरती करण्याचे मनसैनिकांना आदेश,मनसेचा मास्टर प्लॅन ठरतोय…
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) आगामी १ मे सभा आणि अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
नांदगावकर म्हणाले, या बैठकीला महाराष्ट्रातील अनेक पदाथिकारी आले होते. १ मे रोजी होणाऱ्या औरंगाबादच्या सभेसाठी सगळी तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अयोध्येच्या ५ जूनच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत. त्याचीही सगळी तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठीची सध्या चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला मनसेचे कार्यकर्ते परवानगी घेऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावेळी राज ठाकरेंकडून महापूजेची सूचना देण्यात आली आहे.
राज ठाकरेंच्या सभांसाठी आम्ही रेकी करून आलो आहोत. कशा पद्धतीने काय करायचं? हे आम्ही ठरवत आहोत. अयोध्येसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अयोध्या दौऱ्यासाठी ट्रेन उपलब्ध करून देण्यासाठी मनसेकडून नितीन सरदेसाई यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे.
सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांना पत्र
राज ठाकरेंना केंद्र सरकरकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाण्याची चर्चा होती. यापार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या बाबतीत राज्याच्या गृहमंत्र्याना आम्ही पत्र लिहिलं आहे, याची कल्पना राज ठाकरेंना दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना पत्र दिलं होतं पण त्यावर काहीही झालं नव्हतं, आता परत राज्य आणि केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे, असंही यावेळी नांदगावकर यांनी सांगितलं. भोंग्यांबाबत सरकारच्या गाईडलाइन्सनंतर अजेंडा ठरवणार
दरम्यान, मशिदीवरील भोंग्यांबाबत ३ मे रोजीच्या मनसेच्या अल्टिमेटमवर सरकारच्या गाईडलाईन्स आल्यानंतर आम्ही आमचा अजेंडा ठरवणार आहोत, असंही यावेळी नांदगावकर यांनी सांगितलं.
तीन तारखा, तीन ठिकाणं मनसेचा प्लॅन काय?
1 मे रोजी औरंगाबादेत सभा- पुण्यात राज ठाकरेंनी घोषणा केल्याप्रमाणे येत्या 01 मे रोजी औरंगाबादमध्ये मनसेच्या सभेचे आयोजन केले जात आहे. याकरिता औरंगाबाद मनसेसह महाराष्ट्रातील सर्व मनसे पदाधिकारी कामाला लागले आहेत, यासंबंधीच्या सूचनाही राज ठाकरे यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
3 मे अक्षयतृतीयेचा मुहूर्त– येत्या 03 मे रोजी अक्षय्य तृतीयेचा दिवसदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी महत्त्वाचा आहे. तीन मे पर्यंत राज्यातील मशिदींवरचे सर्व भोंगे उतरवले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यावर गृहमंत्रालयातर्फे काय निर्णय घेतला जातात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. सरकारच्या या निर्णयानंतरच मनसेची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली जाईल, असं आजच्या बैठकीत ठरलं. दरम्यान, या दिवशी मुंबईत महाआरतीचं आयोजन करण्यात आल्यानं नांदगावकर यांनी सांगितलं. 03 तारखेच्या रणनितीबाबत राज्य तसेच केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
5 जून रोजी अयोध्या दौरा– येत्या पाच जून रोजी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याचीही घोषणा केली आहे. याकरिता अनेक मनसैनिकदेखील अयोध्येत दाखल होणार आहेत. मनसेच्या दृष्टीने हा दौराही महत्त्वपूर्ण असेल. याकरिताही नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. मनसेच्या पदाधिकारी अयोध्येत जाऊन या सभेकरिता रेकी करून आले असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.