….शिवाय हिंदू विवाह वैध मानला जाणार नाही- हायकोर्ट
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। हिंदू विवाह पद्धतीमध्ये सप्तपदीच्या विधीला फार महत्त्व दिलं जातं. सप्तपदीशिवाय विवाह सोहळा पूर्ण झाल्याचं मानत नाहीत. याबाबत अलाहाबाद हायकोर्टानं एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. घटस्फोट न घेता आपल्या पत्नीनं पुनर्विवाह केल्याचा आरोप एका पतीनं केला होता. त्यामुळे तिला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यानं केली होती. अलाहाबाद हायकोर्टानं या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटलं की, सप्तपदी आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह वैध नाही. कोर्टानं तक्रार प्रकरणाची संपूर्ण प्रक्रिया रद्द केली आहे.
स्मृती सिंह यांनी दाखल केलेल्या याचिका स्वीकारत न्यायमूर्ती संजय कुमार सिंह म्हणाले, ‘विवाहासंदर्भातील ‘विधी’ या शब्दाचा अर्थ योग्य समारंभ आणि योग्य पद्धतीनं विवाह सोहळा करण्याचा नियम आहे. जोपर्यंत विवाहात सर्व विधी होत नाहीत तोपर्यंत तो सोहळा मानला जात नाही. कोर्टानं म्हटलं आहे की, ‘पक्षकारांना लागू असलेल्या कायद्यानुसार जर हा विवाह वैध नसेल तर कायद्याच्या दृष्टीनंही तो विवाह अधिकृत नाही. हिंदू कायद्यानुसार वैध विवाहासाठी आवश्यक असलेल्या घटकांपैकी ‘सप्तपदी’ विधी हा एक महत्त्वाचा घटक आहे. पण, सध्याच्या प्रकरणात या पुराव्याचा अभाव आहे.’
याचिकाकर्त्या स्मृती सिंह यांचं लग्न २०१७ मध्ये सत्यम सिंह यांच्याशी झालं होतं. पण, नातेसंबंधांतील कटुतेमुळे तिनं सासरचं घर सोडलं आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला. तपासाअंती पोलिसांनी पती व सासरच्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. नंतर सत्यमने आपल्या पत्नीवर दुसरं लग्न केल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. मिर्झापूर मंडळ अधिकाऱ्यांनी सदर अर्जाची सखोल चौकशी केली असता स्मृती यांच्यावरील दुसऱ्या लग्नाचे आरोप खोटे असल्याचं आढळलं.
त्यानंतर, सत्यमने २० सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा पत्नीविरुद्ध तक्रार दाखल केली आणि तिनं दुसरं लग्न केल्याचा आरोप केला. २१ एप्रिल २०२२ रोजी मिर्झापूरमधील संबंधित दंडाधिकाऱ्यांनी स्मृती यांना समन्स बजावलं. समन्स आदेश आणि तक्रार प्रकरणाच्या संपूर्ण कार्यवाहीला आव्हान देणारी सध्याची याचिका स्मृती यांनी हायकोर्टात दाखल केली.
हायकोर्टानं हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम सातचा उल्लेख करत आपलं मत मांडलं आहे. कलम सातनुसार, हिंदू विवाह संपूर्ण विधींसह केला पाहिजे, ज्यामध्ये सप्तपदीचाही (वधू-वरांनी पवित्र अग्नीभोवती सात फेरे घेणं) समावेश असेल. सप्तपदीमुळे लग्न पूर्ण होतं.
२१ एप्रिल २०२२ चा समन्स आदेश रद्द करून याचिकाकर्त्या पत्नीविरुद्ध मिर्झापूर कोर्टात प्रलंबित असलेल्या तक्रारीच्या प्रकरणातील पुढील कार्यवाही हायकोर्टानं रद्द केली. कोर्टानं म्हटलं की, ‘फिर्यादीत सप्तपदीचा उल्लेख नाही. त्यामुळे या कोर्टाच्या दृष्टीनं, अर्जदारावर प्रथमदर्शनी कोणताही फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही. कारण, दुसरा विवाह केल्याचा आरोप निराधार आहे.’