पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? क्रूड ऑईलची आयात घसरली
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आंतरराष्ट्रीय बाजारात युरोपियन संघ आणि अमेरिकेने रशियाची कोंडी केल्यानंतर भारत हा चीन खालोखाल सर्वात मोठा कच्चा तेलाचा (Crude Oil) आयातदार देश ठरला. गेल्या वर्षभरात भारताने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल आयात केले आहे. 0.01 टक्क्यांहून हा आकडा 35 टक्क्यांच्या घरात गेला आहे. भारताने प्रत्येक दिवशी रशियाकडून 1.6 दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले आहे. रशियानंतर इराक आणि सौदी अरब हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पण गेल्या महिन्यात आयातीत मोठी घसरण दिसून आली. त्याचा तुमच्या खिशावर तर परिणाम होणार नाही ना? पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार तर नाही ना?
गेल्या महिन्यात जानेवारीच्या तुलनेत 28 टक्के कमी कच्चे तेल आयात करण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये भारताने रशियाकडून जानेवारीच्या तुलनेत कमी कच्चे तेल आयात केले. 2021 मध्ये भारताने रशियाकडून 1 टक्क्यांहून कमी कच्चा तेलाची आयात केली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तर काहीच तेल आयात करण्यात आले नव्हते. फेब्रुवारी 2022 नंतर कच्चा तेलाच्या आयातीत उसळी आली. त्याचा फटका इराक आणि सौदी अरब या देशांना बसला. गेल्या वर्षी त्यांचा एकूण वाटा 43 टक्क्यांहून 34 टक्क्यांवर आला. फेब्रुवारीत रशियाचे इंधन तेलाची आयात घसरली. एका महिन्यात प्रत्येक दिवशी केवळ 123,000 बॅरल तेल आयात करण्यात आले.
आज डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 0.04 टक्क्यांची वाढ झाली. किंमत 77.72 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली. तर 1.03 टक्क्यांची वाढ होऊन 84.31 डॉलर प्रति बॅरलवर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) व्यापार करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढउतार होत असली तरी वर्षभरात मात्र या किंमती 15 टक्क्यांनी घसरल्या आहेत. 2006-07 मध्ये भारत 27 देशांकडून इंधन आयात करत होता. 2021-22 मध्ये ही संख्या 39 इतकी झाली आहे.