संजय राऊत प्रकरणी मुंबईत छापेमारी, अनेकांना बजावले समन्स
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर आज त्यांच्या संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरू असून याप्रकरणी काही लोकांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं असल्याचीही माहिती समोर आली आहे.
पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी शिवेसना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहे. रविवारी सकाळपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरू होती. घरात साडेअकरा लाखांची कॅश सापडल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. तिथे त्यांची आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, पीएमएलए कोर्टाने त्यांना काल चार ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे.
संजय राऊतांवर काय आरोप लावले?
१) पत्राचाळ घोटाळा प्रकरणात राऊतांचा हात
प्रविण राऊत हे नुसते फ्रन्ट मॅन असून संजय राऊत यांचा पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे.
२) राऊतांच्या खात्यात १ कोटी ६ लाख रूपये
प्रविण राऊत हे पत्राचाळीतील डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रूपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवण्यात आले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. त्यामुळे पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा राऊतांना झाला आहे.
३) प्रविण राऊत हे फक्त नावालाच, खरे आरोपी राऊतच
या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं. तसेच ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली ते प्रविण राऊत हे नावालाच होते. मात्र, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून व्यवहार करत होते, असं ईडीने कोर्टात सांगितलं. त्यामुळे पत्राचाळीतील गैरव्यवहार आणि अलिबाग येथील जमिनीतील सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले आहे.
४) राऊतांनी साक्षीदारांना धमकावलं
या प्रकरणात संजय राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने कोर्टात सांगितलं आहे. संजय राऊतांना जर सोडलं तर ते पुन्हा अशाच प्रकारचं कृत्य करू शकतात. त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी, अशी मागणी ईडीकडून करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा