राज्यातून पाऊस जाणार, गारठा वाढणार, तापमानात घट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. अगदी हिवाळ्यात सुदधा अवकाळी पावसाने हजेरी लावली. या सगळ्याचा परिणाम शेतावर झाल्याने शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली. मात्र आता अवकाळी पावसा पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोकण वगळता उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली आले आहे. आज तापमानात २ ते ३ अंशांची घट होणार असल्याने गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आता पुढचे काही दिवस राज्य गारठणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागीय केंद्राने १९ जानेवारीनंतर राज्यामध्ये थंडी वाढेल असा अंदाज वर्तवलाय. जानेवारीमधील कमाल तापमान हे राज्यभरात असलेल्या सामान्य तापमानापेक्षा कमी असेल असा अंदाज आहे. थंडी ही विशेषतः मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वाढेल
निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २२ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
भारतीय हवामान खात्याने थंड वातावरणात उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा दिला आहे. आज आकाश निरभ्र असेल. सकाळी हलके धुके असेल. दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण असेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतात थंडीचे दिवस आणि कडक थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. पुढील चार ते पाच दिवस सकाळी आणि रात्री दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, किमान तापमानात काहीशी घट होईल. तसेच आकाश काही प्रमाणात निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्चिमी प्रकोपानंतर उत्तरेकडून वारे वाहू लागले तर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.