भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज ठाकरेच्या ट्विटने चर्चांना उधाण,संकटकाळी मोठ्या भावाची साथ देणार?

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना पक्षावर आज खूप मोठं संकट कोसळलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेबद्दल गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने नकारात्मक बातम्या येत आहेत. शिवसेनेच्या 40 आमदार आणि 12 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. खरंतर हा आदेश शिंदे गटासाठीदेखील आहे. दोन्ही गटाला या निवडणुकीत नवं नाव आणि चिन्हाची निवड करुन पोटनिवडणुकीला सामोरं जायचं आहे. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींदरम्यान उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. त्यांच्या भूमिकेनंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेना संघटना आणि पक्ष उभं राहण्यासाठी त्यावेळची परिस्थिती देखील तितकीच महत्त्वाची होती. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या या छोट्या संघटनेचं रुपांतर आज महाराष्ट्रातील मोठ्या पक्षाच्या रुपात वटवृक्षासारखं झालं होतं. पण अचानक शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय असलेली अनेक माणसं त्यांच्यापासून दूर गेली. या संकट काळात ठाकरे कुटुंबातील अनेक सदस्यांनी ठाकरेंकडे पाठ फिरवली आहे. उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू जयदेव ठाकरे, त्यांच्या पत्नी स्मिता ठाकरे, मोठे दिवंगत बंधू बिंदूमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे यांनी शिंदेंना पाठिंबा दर्शवला आहे.

या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे कुटुंबीयदेखील आपल्याचसोबत आहेत, असं चित्र निर्माण करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत. पण नियतीने कदाचित वेगळंच काहीतरी लिहिलं असेल तर? कारण उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक वेगळं ट्विट केलं आहे. त्यांनी केलेल्या एका ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी सर्वात मोलाचा सल्ला दिला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, असं राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं आहे तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या संकटकाळात आपल्या मोठ्या भावाच्या मदतीला धाऊन जायचं का? अशा विचारात राज ठाकरे असू शकतात. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून तशी मदतीसाठी साद घातली जाण्याची शक्यता फार कमी आहे, अशी देखील चर्चा आहे. दुसरीकडे दोन्ही बंधू एकत्र यावेत अशी महाराष्ट्रातील लाखो नागरिकांचीसुद्धा इच्छा आहे. याबाबत नेहमी आणि वेळोवेळी चर्चा होत आली आहे. पण वास्तव्यात तसं काहीच आतापर्यंत घडलेलं नाही.

शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा आत्माच आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला. लाखो शिवसैनिकाला या माध्यमातून एकत्र जोडलं. अनेकांना मोठं केलं. राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय तालमीत मोठे झाले. त्यांच्याकडूनच त्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं जाणं हे राज ठाकरे यांनादेखील अस्वस्थ करणारं असू शकतं. उद्धव ठाकरे एकदा रुग्णालयात दाखल असताना राज ठाकरे यांनी त्यांच्या गाडीची स्टेअरिंग हातात घेतलेलं हे संबंध महाराष्ट्राने पाहिलं होतं. त्यामुळे या संकट काळात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनादेखील ठाकरे कुटुंबातील दोन भाऊ एकत्र येतील का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून आधी साद येऊ द्या, अशी भूमिका मांडली होती. याचाच अर्थ राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याची साद घातली तर कदाचित राज ठाकरे मदतीसाठी धावून जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राजकीय विश्वात आज शेवटी ठाकरे घराण्याचा आणि मुख्य म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा देखील प्रश्न आहे. त्यामुळे शिवसेना हे नाव अवितरत राहण्यासाठी, शिवसेनेचं अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात अबाधित राहण्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ही खूप मोठी घटना असेल. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणंदेखील बदलून जातील. पण तसं घडतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

राज ठाकरेंचं नेमकं ट्विट काय?
“सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक वाढल्याचं बघायला मिळालं होतं. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. राज ठाकरे शिंदे गटाच्या मेळाव्यात जातील, अशी देखील चर्चा होती. पण तसं काही घडलं नाही. या दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या बस पार्क करण्यात आल्या, तसंच कार्यकर्त्यांच्या खान-पानाची सोय करण्यात आली, यावरून मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला होता.

‘बीकेसी मैदानावर अनेक राजकीय सभा झाल्या. अगदी पंतप्रधानांचीही झाली.पण सभेसाठीच्या बसेस आजवर कुणी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये पार्क केल्या नाहीत, गर्दीच्या खान-पानाची सोय केली नाही. पार्किंगच्या या अशैक्षणिक सेवेसाठी शिंदेशाहीने विद्यापीठाला किती ‘खोके’ शुल्क दिले?’, असा सवाल मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी केला होता. विशेष म्हणजे शिंदे सरकारवर विरोधकांकडून खोके सरकार असे आरोप वारंवार केले जात होते, पण मनसेकडून मात्र पहिल्यांदाच खोके या शब्दाचा वापर करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!