१०० कोटीला राज्यपाल पद या राज्यसभेचे तिकीट! महाराष्ट्रातील रॅकेटचा सीबीआय कडून पर्दाफाश
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। राज्यपाल पद आणि राज्यसभेच्या तिकिटांबाबत खोटी आश्वासने देऊन लोकांची १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केले असून, यामध्ये महाराष्ट्रातील आरोपींचा संबंध असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
सीबीआच्या एफआयआरमध्ये महाराष्ट्रातील लातूर विभागातील कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगावचे रवींद्र विठ्ठल नाईक आणि महेंद्र पाल अरोरा, अभिषेक बुरा आणि दिल्ली-एनसीआरचे मोहम्मद एजाज खान यांची नावे दाखल केली आहेत.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, “या आरोपींमधील बंडगर हा सीबीआयचा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता. एवढेच नाही तर तो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध लोकांसमोर दाखवत होता. तो बुरा, अरोरा, खान आणि नाईक यांना लोकांना काम देण्याचे आमिष दाखवत होता. जेणेकरून त्या बदल्यात करोडो रुपयांचे सौदे करता येतील”, अशी माहिती सीबीआच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली.
शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी पळून गेला
दरम्यान, सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी पळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय आरोपींनी राज्यसभेतील जागांची व्यवस्था, राज्यपालपदी नियुक्ती, केंद्र सरकारच्या मंत्रालये आणि विभागांतर्गत विविध सरकारी संस्थांमध्ये अध्यक्षपदी नियुक्ती अशी खोटी आश्वासने देऊन खासगी व्यक्तींना फसवण्याचा कट रचला होता.