जबाबदारीतून मला मुक्त करा! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लागले निवृत्तीचे वेध
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपल्या विधानांमुळे आणि भूमिकांमुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आता निवृत्तीचे वेध लागले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. ही विनंती मान्य झाली तर महाराष्ट्राला लवकरच नवे राज्यपाल मिळतील.
नरेंद्र मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौर्यावर आले होते. त्यावेळी त्यांची भेट घेऊन आपण त्यांच्याकडे राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती खुद्द कोश्यारी यांनी सोमवारी दिली. राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनाचा उर्वरित काळ चिंतन, मननात घालविण्याचा मानस आपण पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याची माहिती कोश्यारी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की यासंदर्भातदेखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील, असे कोश्यारी यांनी म्हटले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी म्हणजे ५ सप्टेंबर २०१९ रोजी कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली, मात्र नियुक्तीपासून त्यांची भूमिका कायम वादग्रस्त राहिली. राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोश्यारी यांनी संधी मिळेल तेव्हा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याची झलक ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात दिसली. नियमबाह्य शपथ घेतली नाही म्हणून त्यांनी काही मंत्र्यांना सुनावले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यास त्यांनी विरोध केला होता. त्यानंतर आघाडीने पाठवलेल्या १२ राज्यपाल नामनियुक्त यादीला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे आजही ही पदे रिक्त आहेत. याशिवाय मराठी-अमराठी वाद निर्माण करून तसेच महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करून कोश्यारी यांनी टीका ओढवून घेतली होती. त्यामुळे आघाडीने विधिमंडळ अधिवेशनात राज्यपाल हटावची मागणी केली होती.
पदमुक्ती २६ जानेवारीपूर्वी की नंतर?
आपलं महानगरला मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदमुक्त करण्याबाबत दिल्लीत वरिष्ठांशी बोलणे केले असून दिल्लीतील त्यांचे बॉस केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याकडेही कोश्यारींबाबत काय करायचे याचा निर्णय विचाराधीन असल्याचे समजते. त्यामुळे येत्या २६ जानेवारीआधी किंवा प्रजासत्ताक दिनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर कोश्यारींना माघारी बोलवायचे एवढेच ठरायचे शिल्लक आहे.