शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, “या” नेत्याच्या दाव्याने खळबळ
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आमदार रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार कन्व्हिन्स झाले असून लवकर मोदी सरकारमध्ये सहभागी होऊ शकतील, असं मोठं विधान रवी राणा यांनी केलं आहे. त्यामुळे पडद्याआड काही घडामोडी सुरू आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल आमदार रवी राणा यांनी यापूर्वीही अशी वक्तव्ये केली आहेत. मात्र, आता त्यांनी अजित पवार यात पुढाकार घेत असल्याचे म्हटलं आहे. डेंग्यूमुळे आजारी असलेले अजित पवार काल कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यात होते. त्यानंतर ते दिल्लीत अमित शाहांना भेटल्याचंही रवी राणा म्हणालेत.
काल शरद पवार आणि अजित पवार यांची कौटुंबिक कार्यक्रमात भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आणि या भेटीनंतर आमदार रवी राणा यांनी शरद पवारसाहेब लवकरच मोदींना पाठिंबा देतील, असं मोठं वक्तव्य करून पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडवून दिला आहे. वास्तविक अजित पवार अनेक दिवसांपासून डेंग्यूने आजारी आहेत. आणि केवळ पवार कुटुंबीयांच्या घरगुती कार्यक्रमासाठी ते काल सहभागी झाले होते. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार याच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार लगेचच पुण्याहून दिल्लीला गेले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक झाली. या सगळ्या घडामोडींवर आता आमदार रवी राणा यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. रवी राणा यांच्या याच वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाले आमदार रवी राणा?
अजित पवारसाहेब शरद पवारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारसाहेब कन्व्हिन्स झाले असतील. भविष्यात अनेक घडामोडी होऊ शकतात. शरद पवार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील आणि शरद पवार-अजित पवार यांच्यातील संघर्ष संपून मोठं ताकदीचं सरकार महाराष्ट्रात दिसेल. आजपर्यंत सर्व घटना अचानक झाल्या आहेत.