ठाकरे सेनेच्या शिवालया समोर शिंदे सेनेचे नवे पक्ष कार्यालय
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ठाकरे शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्हावरून लढाई सुरू आहे. एक एक पाऊल टाकत शिंदे गटाकडे शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न सुरू केला. आता मंत्रालयात सुद्धा शिंदे गटाने आपले कार्यालय सुरू केले आहे. शिवसेनेच्या कार्यालयासमोरच शिंदे गटाला बंगला मिळाला आहे.
शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने पक्षचिन्हापासून ते खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा करत आहे. आता मंत्रालयात सुद्धा शिंदे गटाने आपले कार्यालय हे शिवसेनेच्या कार्यालयासमोर उघडले आहे. मंत्रालयाच्या समोर क -२ ब्रम्हगिरी हा बंगला शिंदे गटाच्या विधिमंडळ कार्यासाठी वाटप झाला आहे. हा मंत्रालयासमोरच शिवसेनेच्या शिवालय या कार्यालया समोरच आहे. त्याच परिसरात आता शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे.
याआधीही पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधान भवनातील सातव्या मजल्यावर पक्ष कार्यालय मिळाले होते. शिवसेनेचे असलेल्या कार्यालयामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी जाण्याचं टाळलं होतं. त्यामुळे विधिमंडळामध्ये दोन शिवसेना कार्यालय तयार झाले. विधान भवनातील तिसऱ्या मजल्यावर शिवसेना पक्ष कार्यालय ठाकरे गटाकडेच आहे.