दसरा मेळाव्या आधीच शिवसेनेला धक्का, ४ आमदार आमदारांसह ३ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात?
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. अशातच शिवसेनेतील आणखी आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
शिवसेना फुटल्यामुळे आमदारांची गळती लागली आहे. शिंदे गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरूच आहे. अशातच बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेमध्ये उरलेल्या आमदारांपैकी ४ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून ३ खासदार देखील लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यात एक मुंबईचे खासदार असतील असा दावा जाधव यांनी केला आहे.
तसंच, मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात येणार असल्याचे बोलले जात असताना त्याला खासदार जाधव यांनी दुजोरा दिला आहे. नार्वेकरच नव्हे तर ३ खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याचे जाधव म्हणाले. ‘बाळासाहेबांच्या विचारला तिलांजली देऊन हिंदुत्व बाजूला ठेवलं मग त्यांना बाळासाहेब यांचे वारसदार म्हणण्याचा अधिकार नाही,अशी टीकाही जाधव यांनी शिवसेनेवर केली.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील 2 आमदारांच्या पाठोपाठ शिवसेना खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जाधव यांच्यावर धडक कारवाई करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा खासदार प्रतापराव जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याने पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. शिवसेनेनं कारवाई केल्यानंतर प्रताप जाधव यांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली.