SSC दहावीचा निकाल ९६.९४ टक्के ,मुलींनी मारली बाजी
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) दहावीच्या परीक्षेचा निकाल आज नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील निकाल ९६.९४ % इतका लागला. यात मुलींनी बाजी मारली आहे.यंदा कोकण विभागाचा निकाल ९९.२७% तर नाशिक विभागाचा निकाल ९५.९०% इतका लागला आहे. यंदा मुलींचा निकाल ९७.९६ टक्के तर मुलांचा निकाल ९६.०६% लागला आहे.
राज्यात १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १५ लाख २१ हजार ००३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ९९.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ९५.९० टक्के लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेला १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे.