दहावी-बारावी निकाला बाबत बोर्ड अधिकाऱ्यांकडून मोठी अपडेट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होताना दिसत आहे. अशात आता बोर्डाच्या निकालांवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सुरूवातीला शिक्षक नंतर शासकीय कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे आता दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता वर्तवली आहे.
अजूनही पेपर तपासणी सुरूच नाही.
इयत्ता दहावी-बारावीचे बहुतेक पेपर झाले आहेत. २५ मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर आहे. अशात अद्यापही शिक्षकांनी झालेले पेपर तपासण्यास सुरुवात केली नाही. बोर्डअधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. संपावर जाण्याआधी काही शिक्षकांनी पेपर तपासण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी हातात घेतलेले काही पेपर तपासून झाले आहेत. मात्र त्यानंतर संप सुरू झाल्यापासून शिक्षकांनी पेपर तपासण्यासाठी घेतले नाहीत.
संप असल्याने अद्यापही शिक्षकांनी पेपर तपासण्यास सुरूवात केलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा परिणाम होत आहे. निकाल उशीरा लागल्यास पुढील अॅडमीशन देखील उशीरा होणार त्यामुळे शिक्षकांना पेपर तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाला ८-१० दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.