राज्यात आजही वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस, तर काही भागात उष्णतेच्या लाटेचाही इशारा,या भागात हाय अलर्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या काही ठिकाणी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला गेला आहे, तर राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. बीड, उस्मानाबाद, छ. संभाजीनगर, जळगाव यवतमाळ, वाशिम, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच हलक्या पावसाचाही अंदाज आहे. परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपिटीचाही अंदाज आहे. या भागांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
नागपूरमध्ये मागील काही दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. पुढील काही दिवस देखील तापमान ४० अंशांच्या मागे पुढे असणार आहे. मात्र पुढील दोन दिवस हे नागपूरमध्ये अवकाळी पावसाचे सावट असणार आहे.
पुण्यात आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पुण्यावर अवकाळी पावसाचं सावट असणार आहे. तर पुण्यामध्ये ४०°c एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. मुंबईत आज उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तर, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २६°C च्या आसपास असेल.