एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडल्याचा तेजस मोरेचा गौप्यस्फोट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे आरोप फेटाळले होते. प्रविण चव्हाण यांनी त्यांचा अशिल तेजस मोरे याच्यावर गंभीर आरोप केला होता. यानंतर आता तेजस मोरे याने चव्हाण यांचे आरोप फेटाळले आहेत. ते स्टिंग मी केलेच नाही. तसेच मी केवळ फिर्यादी आणि चव्हाण यांच्यातील दुवा होतो. अगोदर अनिल देशमुख आणि नंतर एकनाथराव खडसे यांच्या सांगण्यावरून हे सर्व घडल्याचे तेजस मोरे याने सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल तेजस मोरे याने खुलासा केला आहे. विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामध्ये छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रविण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान तेजस मोरे यांनी केले आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या ज्या व्हिडीओमधे मी उपस्थित आहे. त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे, असा दावा तेजस मोरे यांनी केला आहे. तेजस मोरे म्हणाले की, प्रवीण चव्हाण यांना मी जुलै २०२१ पासून ओळखत आहे. मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले होते, त्या गुन्ह्यात त्यांनी मला जामीन मिळवून दिला होता. जामीन झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयात माझे जाणे-येणे होत होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की जबाबासंदर्भातील दोन-तीन ड्राफ्ट करायचे आहेत. माझे इंग्लिशवर कमांड नाही. तुझं इंग्लिश चांगलं असल्यामुळे तू मला ड्राफ्ट तयार करून दिले तर बरं होईल. त्याअनुषंगाने माझे त्यांच्या कार्यालयात जाणे-येणे वाढले. मात्र, ते कशाचे ड्राफ्ट तयार करत आहेत, हे त्यावेळी मला माहीत नव्हते. जसजसं मी ड्राफ्ट करायला लागलो, तसतसं मला समजायला लागले की रमेश कदम, बीएचआर बॅंक, रवींद्र बराटे किंवा गिरीश महाजन यांचे प्रकरण असो यासंदर्भातील वेगवेगळे जबाब तयार करून घ्यायचे.
पोलिसांना पुरविण्यात येणारी माहितीही तेच पहायचे. हे सर्व ते माझ्याकडून करून घ्यायचे. मला कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे ते काय करत आहेत, हे मला समजायचे नाही. मला वाटायचं की हे सरकारी वकिलाचे काम आहे. कारण, त्यांच्याकडे पोलिसांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. त्यामुळे त्याबाबतचे ज्ञान नसल्यामुळे मला त्यात गैर काही वाटायचे नाही. ते जे सांगायचे, ते मी करत जायचो. गिरीश महाजन यांच्यासंदर्भात जबाब देण्यासाठी जे साक्षीदार यायचे, त्यांचे जबाब हे चव्हाण करून घ्यायचे. ते जबाब देण्यासाठी मलाही पोलिस ठाण्यात चव्हाण पाठवायचे. पण ९ जानेवारी रोजी जो छापा टाकण्यात आला. त्यानंतर माझ्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली. सरकारी वकिल छापा टाकण्याचे मॅनेज करत आहेत आणि पोलिस त्यांचे ऐकतात, हे कसं काय, असा प्रश्न मला पडला, असे मोरे यांनी स्पष्ट केले. अनेक खटल्यांचे जबाब मी नोंद केले आहेत.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी नोंद केले आहेत.परंतु, पुणे पोलीस गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेल्यापासून माझे मतपरिवर्तन झाले. कारण पुणे पोलिसांकडून भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट करण्यात आले होते. माझे दोन-तीन वकील मित्र आहेत, त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर समजले की चव्हाण जे करत आहेत, ते चुकीचे आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यापासून मी हळूहळू बाजूला होत गेलो, असा गौप्यस्फोट तेजस मोरे यांनी केला आहे. जळगावला गेलेल्या पुणे पोलिसांच्या जेवणाचे बील देखील मी गुगल पे वरुन भरले आहे. प्रविण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांकडून बनावट पुरावे तयार करुन ते भोईटेंच्या घरात प्लांट करण्यात आले. काहीही करुन गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता,असा खुलासा तेजस मोरे यांनी केला आहे.
तसेच “गिरीश महाजन यांना अडकविण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे प्रविण चव्हाण यांना सांगत होते. मी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच भेटलेलो नाही. प्रविण चव्हाण हे मला खोट्या गुन्ह्यात अडकवतील ही भीती आहे. त्यामुळे मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस मोरे यांनी दिली आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा