ठाकरे गटाचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या नावाला आक्षेप? कोर्टात याचिका दाखल
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव अंधेरी पोटनिवडणुकीसाठी वापरण्यास दिलं आहे.या नावाला ठाकरे गटाचा विरोध असल्याचं बोललं जातंय. दिल्ली हायकोर्टात ठाकरे गटाकडून एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेतून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली जावी, अशी मागणी त्यांनी केलीय. या याचिकेत शिंदे गटाच्या नावाचा उल्लेख केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. बाळासाहेबांच्या नावाबाबत ठाकरे गट कोर्टाट दाद मागणार असल्याची माहिती समोर आलीय.
ठाकरे गटानं निवडणूक आयोगाला दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. खरंतर कालच या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली होती. पण काल काही ही सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, आज नेमकं या सुनावणीदरम्यान, काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेच्या हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत शिंदे गटानेही सावध पवित्रा घेतला आहे. आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार दिल्ली हायकोर्टात एक कॅव्हेटही शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलंय.
निवडणूक आयोगाने सोमवारी अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव दिलं आहे. तस मशाल हे निवडणूक चिन्हही दिलंय. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. तर चिन्हाबाबत तीन पर्यात आज शिंदे गटाकडून पुन्हा निवडणूक आयोगाला दिले जाणार असल्याचं कळतंय.