चक्रिवादळ गेलं पुढे,आता मान्सून केव्हा? महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं…..
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्यातून ‘बिपरजॉय’ चक्रिवादळानं आता पुढील रोखानं प्रवास सुरु केला असून, हे वादळ राजस्थानच्या दिशेनं पुढे जाताना दिसत आहे. साधारण ताशी १४० किमी इतक्या वेगानं हे चक्रिवादळाचे वारे वाहत असून सध्याच्या घडीला या वादळाचा लँडफॉल सुरू झाला असून, त्या पार्श्वभूमीवर उदभवणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर सौराष्ट्र, कच्छ, द्वारकेत प्रशासनानं सर्वतोपरी तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. या भागांमध्ये समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळणार असून, इथं पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. इथं महाराष्ट्रासह मुंबईच्या किनारपट्टी भागातही वादळाचे स्पष्ट परिणाम दिसून येत आहेत.
मान्सून लांबणीवर,महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान खात्यानं स्पष्टच सांगितलं…
चक्रिवादळानं लांबणीवर गेलेला पाऊस आता आणखी रखडण्याची चिन्हं असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच हवामानशास्त्र विभागानंही यासंदर्भातील माहिती दिल्यामुळं नागरिकांची निराशा तर झालीच, पण बळीराजाची चिंताही वाढली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार येत्या आठवड्यामध्येही पावसाची अपेक्षा न बाळगलेलीच बरी. आता राज्यात थेट २३ जूननंतरच मान्सून पुन्हा नव्यानं सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.
केरळमागोमाग मान्सून ११ जून रोजी तळकोकणाकत आला खरा पण, त्यानंतर मात्र त्याचा प्रवास फारसा समाधानकारक झाला नाही. परिणामी मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास आता २३ जून उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. आता पुढच्या मुहूर्तावरही मान्सून आला नाही, तर मात्र राज्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. राज्यात अनेक शहरात या धर्तीवर पाण्याचं नियोजनही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.