पुढील तीन ते चार दिवस थंडीचा जोर कायम राहणार, राज्यातही तापमानाचा पारा घसरला
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मागील काही दिवसांपासून भारतातील अनेक भागात थंडी वाढत आहे. वाढत्या गारठ्यामुळे नागरिकांनी गरम कपडे परिधान करण्यास सुरूवात केली आहे. सद्यस्थितीत उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून, महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील तीन दिवस उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार असून, धुके पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळे हुहहुडी वाढली. मुंबईतही थंडी वाढली असून, मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस पूर्व भारतात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ होईल. वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. त्यानंतर फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवसात मध्य प्रदेशातील किमान तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे
देशाची राजधानी दिल्लीतही थंडीत वाढ झाल्याने हुडहुडी वाढली आहे. रविवारी सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विविध भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे. वायव्य मैदानी भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीमध्ये जास्त आर्द्रता असणार आहे. त्याचा परिणाम हवामानावर दिसून येणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. रविवारी पहाटे हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओरिसा, आसाम आणि त्रिपुरामध्ये आणखी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानमध्ये 25 आणि 26 डिसेंबर रोजी दिवसा आणि रात्री धुके कमी होतील. भारतीय हवामान खात्याने पुढील तीन दिवस पंजाब हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.