राज्यात पुढचे चार दिवस धो-धो पावसाचे, ” या ” भागात बरसणार पाऊस
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। मुंबईसह राज्यभरात मागील दोन दिवसांपासून पाऊस तुफान बॅटींग करत आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पुढील चार दिवस राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज जारी करण्यात आला आहे. शिवाय गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या काही भागात संततधार पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले असून नद्याही तुडुंब भरून वाहत आहेत. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच किनारपट्टीच्या भागात अतिवेगवान वार्याचा अंदाज वतरविण्यात आला आहे. मुंबईसह राज्यात गेल्या गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला असून कोकणासह नाशिक तसेच इतर काही भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी रात्रीपासून मुंबईसह राज्यात पुन्हा पावसाने बरसायला सुरवात केली आहे. येत्या चार दिवसांत राज्यातील उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व आणि पश्चिम विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर मराठवाड्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.