भूचुंबकीय वादळ पृथ्वीवर धडकण्याची शक्यता, जगभरातील वीज पुरवठा होऊ शकतो खंडित!
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भूचुंबकीय वादळ आज पृथ्वीवर धडकण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. नॅशनल अॅरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पृथ्वीवर कोरोनल मास इजेक्शन (CME) आदळण्याची शक्यता आहे. यामुळे भूचुंबकीय वादळे होऊ शकतात.
पृथ्वीवर आदळणाऱ्या भूचुंबकीय वादळामुळे विद्युत ग्रीड आणि अशा इतर वस्तूंचे नुकसान होऊ शकते. या वादळाचा वेग 429 ते 575 किमी प्रति सेकंद असू शकतो. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की सूर्याच्या अॅक्टिव्हिटीमध्ये बदल झाला आहे.
सौर भूचुंबकीय वादळ म्हणजे सूर्यापासून मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शन होणार आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा उच्च तीव्रतेची ऊर्जा पृथ्वी आणि इतर काही ग्रहांकडे सोडली जाईल. पृथ्वीवर आदळल्यानंतर हे वादळ भयंकर स्वरूप धारण करू शकते, असे नासाने म्हटले आहे. याचे कारण सौर वाऱ्याच्या प्रवाहाचा वेग जास्त आहे.